बुधवार, २६ जानेवारी, २०११

ट्रेन

तुझी गाडी आली, आणि तू निघून गेलास

नजरेपुढून सरकत्या दरवजांकडे मी पाहात राहिले

माझ्याही नकळत स्वतःला पुन्हा

तुझ्यात हरवत गेले.

रस्त्यावरच्या गर्दीची अचानक जाणीव झाली

ओळखीची वाटणारी माणसंही मला

अचानक परकी झाली

तू आहेस म्हणायचं, तर तू कुठेच दिसत नाहीस

तू नाहीस म्हणायचं, तर तुझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही

खांद्यावरच्या ओझ्याची जाणीव झाली,

तेव्हा हळूच मागे झाले.

गर्दी येत गेली, ट्रेनमागून ट्रेन भरत गेली

माणसं सगळी पळत राहिली

कसल्याशा अनाम ओढीनं...

मी मात्र तिथेच थांबले

माझी गाडी सुटण्याची वाट पाहात...

आणि जाणीव झाली, एका दाहक वेदनेची

भरल्या प्लॅटफॉर्मवर एकाकी कोपऱ्याची...

माझ्यासाठी आता तू

मधल्या स्टेशनवर उतरू शकणार नाहीस.

तुझं-माझं स्टेशनही एक असणार नाही.

मग आपली भेट केव्हा? टर्मिनसवर कधी भेटू तेव्हा?

एकाच रस्त्यावरून जाऊ आपण,

पण एकत्र प्रवासाचं सुख नाही.

तुझा ट्रॅक वेगळा, माझाही वेगळा.

बस, काही क्षणांचा प्रवास एकत्र घडला...

- जान्हवी मुळे

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

अवकाळी पाऊस.. आठवणींचा

पाऊस...
आजकाल कधीही येतो.
तुझ्या आठवणींसारखा भरून वाहतो..

अचानक विजा चमकतात तेव्हा
दिसतात काही धूसर प्रतिमा...
आणि वारा घेऊन येतो गंध कुठूनसा.

तेव्हा मी डोळे मिटून घेते.
कारण माझ्या आत आजही
तीच जुनी मी राहते.

एक श्वास अडखळतो..
एक शब्द अडकतो..
आतल्या आत माझा जीव तुलाच शोधत राहतो...

डोळे उघडतात तेव्हा
जग नव्याने कळते.
तुझी आठवण येते आणि मी स्वतःशीच हसते..

शनिवार, ९ जानेवारी, २०१०

ऋतू बदलेल

काही गोष्टी अशा पटकन थोडीच संपतात?

नवी फुलं अशी लगेच कुठे उमलतात?

ऋतू बदलण्याची वाट पहावीच लागते

मला खात्री आहे

पुन्हा वसंत फुलेल, नवी पालवी फुटेल

ती बाग कदाचित हीच असणार नाही

तो माळीही दुसरा असेल

पण मी इथंच राहीन

वाट पहात

त्या अजाण अनाकलनीय भविष्याची,

जे उद्या माझं वर्तमान असेल..

मी वाट पहात राहीन

मला खात्री आहे

वठलेल्या झाडालाही नवे धुमारे फुटतील


- जान्हवी

शनिवार, २१ नोव्हेंबर, २००९

सचिन- स्वैर अनुवाद

कदाचित, तुझ्यामुळंच सचिन!
माझ्यासाठी क्रिकेट फक्त एक खेळ उरलेला नाही,
तर ती बनलीय एक कविता..
एक सुरेल कविता...

तीव्रता, एकाग्रता, उत्स्फुर्तता,
मनाचा कल, ताण-तणाव आणि आकार,
ताल, हालचाल आणि मिलाफ
आणि बॉल बाऊंडरीबाहेर जाताना होणारा
कल्पना आणि प्रतिभेचा लखलखाट.
आणि सार सारं काही
जे अनिश्चिततेच्या धाग्याला लटकत राहतं...
प्रत्येक हालचालीची गती
प्रत्येक कलात्मक हालचाल
आणि एक द्वंद्व..

हे सारं काही मैदानावरचं एक गाणं नाही
तर दुसरं काय आहे?

म्हणूनच,
हे सगळे शब्द सुचतायत मला,
प्रिय सचिन,
जेव्हा मी तुझ्या खेळाचं वर्णन करयला बसतो...!

मूळ कविता- रमेश तेंडुलकर
अनुवाद- जान्हवी मुळे

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

प्रिय मैत्रिणीस...

आठवतंय? याच झाडाखाली
भातुकलीचा डाव मांडायचो आपण
फांद्यांवर चढून आणि लपंडाव खेळायचो आपण

भांडणं झाली की, ढसाढसा रडायचो
पडलो, धडपडलो तरी उठून उभं रहायचो
अंगावरची धूळ झटकत खदाखदा हसायचो

फादीवरच्या चिऊकाऊंना
आपली सवय होऊन जायची
घरट्यामध्ये त्यांची पिलंही
आपल्यासारखीच बागडायची

ऊन चढल्या दुपारी हाच वृक्षराज
तुझ्यामाझ्यावर सावली धरायचा
गवताला कुरवाळणा-या फांद्यांनी
जमिनीशी गप्पा मारायचा

ऊन्हं उतरताना त्याचा
निरोप घ्यायचो आपण
घर मागंच ठेवून
घराकडं परतायचो आपण

कधी कोजागिरीच्या दूधात
त्याचंही प्रतिबिंब पडायचं
आपण शेकोटीभोवती नाचताना
त्याचंह अंग थरथरायचं

पावसात आपण खिडकीत
धडे गिरवत बसायचो
बाहेर भिजणा-या त्याच्याकडे
मत्सरानं पहायचो

वर्ष उलटून गेली, पाखऱं उडून गेली
पिढ्या-पिढ्यांना आधार देत तो उभाच राहिला
तुझ्या-माझ्या बोलांचाही पाचोळा तेवढा उरला

आजही ऊन पडतं,
आजही पाऊस पडतो
थरथरता हिवाळा संपला की, वसंत जागा होतो

झाडाखाली जाताना पण
जीव आता घाबरा होतो
तुझी आठवण येते
आणि श्वासच अधुरा होतो...

- जान्हवी

शनिवार, २ मे, २००९

अनुवाद :

माझी सखी आणि सहकारी मुग्धा देशमुख, शाहरूख खानच्या नव्या ब्लॉगविषयी स्टोरी तयार करत होती. शाहरुखनं त्या ब्लॉगचा शेवट थिओडर रूझवेल्टच्या काही ओळींनी केलाय. तिला त्या ओळी मराठीत translate करून हव्या होत्या. So on her request.. मी रूझवेल्टला मराठीत लिहिण्याची गुस्ताखी केली आहे.... माहित नाही हा प्रयत्न कसा आहे...

टीकाकार तितका महत्त्वाचा नसतो
मोठी माणसंही कशी ठेचाळतात,
हे सांगणाराही तितका महत्त्वाचा नसतो..
किंवा यश मळवणारे गोष्टी कशा वेगळ्या पद्धतीनं करतात
हे सांगणाराही मह्त्त्वाचा नसतो...

सगळं श्रेय त्यांचच असतं,
जो स्वतः आखाड्यात उतरतो,
ज्याचा चेहरा धूळ आणि घाम आणि रक्तानं माखून जातो,
जो जीवापाड मेहनत करतो,
जो चुकतो, वारंवार कमीही पडतो,
कारण चुका आणि अडथळ्यांशिवाय प्रयत्न करणं शक्यच नसतं

पण ज्याला खरोखरच काहीतरी करून दाखवायचं असतं,
त्याला ठाउक असतं,
तळमळ आणि अपार श्रद्धा म्हणजे नेमकं काय असतं...
जो स्वतःला एखाद्या चांगल्या कामात झोकून देतो,
ज्याला ठाउक असतं...
शेवटी अत्युच्च यश मिळणार असतं,

आणि जरी तो हरला,
तरी त्याचा पराभव झालाय एक मोठं धाडस करताना,
म्हणूनच,
त्याची गणना कधीच होणार नाही
निष्क्रीय आणि भित्र्या लोकांच्यात,
ज्यांना ठाउक नसतं,
विजय किंवा पराभव, म्हणजे नेमकं काय असतं...

मूळ कविता - थिओडर रूझवेल्ट, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष


स्वैर अनुवाद - जान्हवी मुळे

"It is not the critic who counts: not the man who points out how the strong man stumbles or where the doer of deeds could have done better.
The credit belongs to the man who is actually in the arena, whose face is marred by dust and sweat and blood, who strives valiantly, who errs and comes up short again and again, because there is no effort without error or shortcoming, but who knows the great enthusiasms, the great devotions, who spends himself for a worthy cause; who, at the best, knows, in the end, the triumph of high achievement, and who, at the worst, if he fails, at least he fails while daring greatly, so that his place shall never be with those cold and timid souls who knew neither victory nor defeat."

- Theodore Roosevelt

"Citizenship in a Republic,"Speech at the Sorbonne, Paris, April 23, 1910

बुधवार, १५ एप्रिल, २००९

कृष्णविवर

जेव्हा एखाद्या ता-याचा स्फोटात अंत होतो,
आणि आकाशातल्या रांगोळीतून
एक ठिपका हरवून जातो,

सगळंच काही संपत नाही...

प्रकाश लोपला तरीही, पदार्थ संपत नाही,
रिकामीशी वाटली तरी, पोकळी रिती रहात नाही...

मृत ता-याचंही एखादं कृष्णविवर बनतं
आणि आपल्याच आसपासच्या ग्रहगोलांना
आपल्यातच ओढत राहतं...

आयुष्याचंही काहीसं असंच असतं
मागे राहिलेलं, उणं-पुरं
मनाला आत, आत खेचत राहतं...

त्या गर्द अंधारात म्हणे,
सारं काही हरवून जातं,
पण मला वाटतं, तिथे
आयुष्य पुन्हा नव्यानं जन्म घेतं...
- जान्हवी

...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.

रविवार, ५ एप्रिल, २००९

नदी

नदीला कुठे ठावूक असतं, तिच्या पाण्यात कसलं प्रतिबिंब पडणारेय?
नदीला कुठे ठावूक असतं, ते प्रतिबिंब कीती काळ राहणारेय?

तिच्या काठावर लोक येत जातात,
पाण्यातल्या सावल्याही तशा बदलत जातात...

नदीला कुठे ठावूक असतं?
सावल्यांचं आपलं असं एक जग नसतं...

पाण्याबरोबर तिला सावलीलाही वाहून न्यायचं असतं,
नदीला फक्त वाहत रहायचं असतं...

नदी वाहत जाते, तशा सावल्या धूसर होतात,
उठलेल्या लहरींमध्ये काही रंग मात्र उरतात.
आणि काठावरची माणसं,
प्रतिंबिंब हरवलं, म्हणून शोक करतात...

नदी,
ती तर फक्त वाहत राहते,
आणि समुद्राला जाऊन मिळते
नाहीतर अशीच लुप्त होते...

नदी,
समुद्राला मिळाली, तर तिचाच एक समुद्र बनतो
पण एखाद्या अमेझॉनसाठी
तोही थोडा मागं सरतो...

- जान्हवी

...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.

गुरुवार, १९ मार्च, २००९

सारंगीच्या शोधात

कुणी एक अनाम गायक
चालत होता आपल्याच धुंदीत
चालता चालता गात होता
कुण्या कवीचे अनाम गीत...

साद दैवी परि ऐकू आली
त्याच्या आर्त गळ्यामधून
आणि एक स्वप्न पाझरले
सारंगीच्या त्या सूरांतून

त्या स्वप्नाच्या मागावरती
माझेही मन चालत गेले
सूरांच्या त्या शोधामध्ये
स्वतःलाच हरवत गेले

रस्ता बाकी वाहत होता
असाच गर्दीनं भरलेला
पण आठवतो तो एकच सूर
मनात कायमचा कोरलेला...

- जान्हवी
...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.

शनिवार, २८ फेब्रुवारी, २००९

चेह-यावर कसलेसे मुखवटे चढवून
माणसं इथं जगत राहतात
किंवा जगण्याचं नाटक करतात

आणि मुखवटे गळून पडतात,
तेव्हा चेहरेच हरवून जातात

कॅमे-याच्या पुढ्यात
फ्लॅश-लाईट्सच्या झगमगाटात
मनाचे अंधारलेले कोपरेही
सहज दडून राहतात...

माथ्यावर जखमा झेलणारे अश्वत्थामे
हसत हसत अमरत्वाचा शाप भोगतात

-जान्हवी

...................................................................................................................................

© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २००९

गंगा

वाहणारी मी नदी,
सागराचा शोध आहे
दोन्ही किनारे सोडून आले
उफळलेला क्रोध आहे

स्वर्गलोकी घर होते,
पृथ्वीवरती येणे झाले,
पर्वताच्या छायेमध्ये
स्वच्छंदी जीणे झाले

ओघ माझा पेलणारा
तो सदाशिव एकच होता
आसक्त तरीही विरक्त असा
बैरागी तो एकच होता...

जटाभारी परी त्याच्या पडता
श्वास माझे अडकून गेले,
स्वत्वाचे संकेत सारे
अलगद अन मोडून गेले


होऊनही तयाची मग
त्याची न मी राहिले
वाहण्याची नियती माझी,
माझी न मी राहिले

भगीरथाने इथे आणिले
मला जगाच्या उद्धाराला
अभिमान तो गळून पडता
गंगेचा उद्धार झाला...

- जान्हवी

...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.